महाराष्ट्राच्या इतिहासात आपण काका-पुतण्या, बाप-लेक, सख्खे भाऊ, दीर-भावजय, चुलत भाऊ, पती- पत्नी अशा एकाच घरातून दोन जणांना निवडणुक लढतांना पाहिलीय. काही वेळा अगदी बोटावर मोजता येईल इतक्या मतांनी समोरचा उमेदवार जिंकलाय.. यासह सत्ता समीकरण आणि राजकारणाच्या इतर गोष्टी देखील आपण पाहत आलोय… मात्र तुम्हाला माहितीय का ? महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याच्या आधीपासून म्हणजे १९५२ पासून ते आजपर्यंत एकाच घराण्याने एका विधानसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व राखलंय.. विशेष करून या राजकीय घराण्याने राज्याला दोन मुख्यमंत्रीपदही दिली आहेत… त्याचाच हा आढावा…
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद म्हटलं की, सर्वात आधी नाव येतं ते वसंतराव नाईक यांचं.. याच वसंतराव नाईक यांनी १९५२ साली पहिल्यांदाच पुसद मतदारसंघावर झेंडा रोवला. सलग पाच टर्म नाईकांनी हा मतदारसंघ आपल्याकडे राखला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मान त्यांनी पटकावला. महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री झालेले वसंतराव नाईक यांनी ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९५७ अशी १२ वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. त्यांनी त्याकाळात पहिले महसुल मंत्री पदही सांभाळलं..
वसंतराव नाईक यांच्यानंतर त्यांचे पुतणे ‘सुधाकरराव नाईक’ राजकारणात सक्रीय झालेत. त्यांनी १९७८ ते १९९० पर्यंत मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. १९९९ मध्ये शरद पवारांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. त्यावेळी सुधाकरराव नाईकांनी पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. जलक्रांतीचे जनक अशी ओळख असलेले सुधाकरराव नाईक पुढे राज्याचे मुख्यमंत्री देखील झालेत. त्यामुळे एकाच कुटुंबातून राज्याला दोन मुख्यमंत्री देणारा पुसद हा पहिलाच मतदारसंघ ठरला..
सुधाकरराव नाईक यांनी सलग चार टर्म पुसदवर वर्चस्व राखल्यानंतर हा मतदारसंघ त्यांचेच बंधू “मनोहरराव नाईक’ यांच्याकडे आला. मनोहरराव नाईक यांनी १९९५ साली विधानसभेची निवडणुक लढवली आणि ते येथून आमदार झालेत. परंतु १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर नाईक कुटुंबाने पक्षांतर केलं. अन् सुधाकरराव नाईक यांनी पुन्हा एकदा आमदारकी पटकावली. त्यानंतर पुढे २००४ ते २०१४ पर्यंत सलग तीनवेळा मनोहर नाईक यांनीच हा मतदारसंघ ताब्यात ठेवला. परंतु पुढे नाईक कुटुंबाला बंडखोरीचा सामना करावा लागला.. २०१९ साली ‘मनोहर नाईक’ यांचे पुतणे ‘निलय नाईक’ यांनी बंडखोरी करत भाजपमध्ये प्रवेश केला.. यावेळी नाईक कुटुंबातच लढाई झाली. मात्र राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईकांनी याठिकाणी बाजी मारली…
मनोहर नाईक यांना ययाती आणि इंद्रनील अशी दोन मुलं… ययाती हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष. तर इंद्रनील नाईक हे आमदार.. राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर इंद्रनील नाईकांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर त्यांचे वडील ‘मनोहरराव नाईक’ यांनी आपण कोणत्या गटात आहोत ते कधीच सांगतिले नाही.. इंद्रनील यांनी अजित पवार गटात जाताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही, याबद्दल ययाती नाईक यांच्यात नाराजी होती. तर दुसरीकडे 2019 मध्ये आपल्याला डावलून आमदारकीची संधी इंद्रनील यांना मिळाल्याने ययाती हे संधीच्या शोधात होते. याचदरम्यान ययाती नाईक यांनी शरद पवार गटातच राहणं पसंत केलं. मात्र शरद पवारांनीही त्यांना डावलल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आणि २०२४ च्या निवडणुकीत दोघे सस्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे राहिले.
यात इंद्रनील नाईक यांनी पुसद विधानसभा मतदारसंघातून ९० हजार मतांची लीड घेत रेकॉर्डब्रेक विजय मिळवला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलंय की एकाच कुटुंबाचं ‘स्वराज्याची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या पुसद मतदारसंघावर सलग ७२ वर्ष वर्चस्व आणि सलग ७२ वर्ष जिंकण्याचा विक्रम ठेवलाय…. पुढे हा विक्रम तुटू शकतो.. का…? आणि महाराष्ट्रात अजूनही असे मतदारसंघ आहेत. त्यावर एकाच घराण्याचं वर्चस्व ठेवलंय…
